भारताची 'चेस क्वीन' अशी ओळख असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखच्या कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. लंडन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक टीम रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने महिला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चीनच्या होऊ यिफानला पराभूत केले.
जागतिक ज्युनियर क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दिव्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. या स्पर्धेत दिव्याने एकूण तीन बक्षिसे पटकावली. दिव्याच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी 'एक्स'वर या सामन्याची छायाचित्रे शेअर करीत तिचे कौतुक केले. 'दिव्याच्या यशातून तिची जिद्द आणि दृढनिश्चय दिसून येतो. तिची कामगिरी देशातील अनेक युवा बुद्धिबळपटूंनाही प्रेरणा देणारी ठरेल. तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा,' असे पंतप्रधानांनी या संदेशात म्हटले आहे. वुमन ग्रॅण्डमास्टर असलेल्या १९ वर्षीय दिव्याने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतील उपांत्य सामन्यात उत्कृष्ट व आक्रमक चाली खेळून सर्वांना आश्चर्यचकित कामगिरी केली. दिव्याने ७४ चालींमध्ये तीन वेळा ' वर्ल्ड चॅम्पियन ' राहिलेल्या यिफानला पराभूत केले. मात्र, निर्णायक लढतीत दिव्याचा उझबेकिस्तानची महिला फिडेमास्टर निलोफरखान इमोमकुझिव्हाने पराभव केला.