कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीचे बलात्कार प्रकरणात नराधम विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने काही महिन्यांपूर्वीच कारागृहात फाशी घेत आत्महत्या केली. याप्रकरणात सहभागी असलेली विशाल याची पत्नी ही जेलमध्ये होती. तिने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. 16 जून रोजी या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या पत्नी साक्षी गवळी हिची कल्याण न्यायालयाने १० हजार रुपयाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली आहे. साक्षी हीने केवळ पुरावे नष्ट करण्यासाठी पतीच्या भीतीने मदत केली होती. यामुळे हा गुन्हा जामीनपात्र असल्याने तिला जामीन मंजूर केल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. या निर्णयानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र, उज्ज्वल निकम यांनी विश्वासघात केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केलाय. सरकारने जेव्हा उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली तेव्हा कल्याण पूर्व येथील सर्वजण राजकीय क्षेत्रातील काही लोक पण या नियुक्तीला विरोध करत होते. माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, असे पीडितेच्या वडिलांनी म्हंटले आहे.