नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाठोडा रिंगरोडवरील शिवशंकर लॉनजवळ १३ जूनच्या मध्यरात्री एका स्क्रॅप दुकानाच्या गार्डवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात गार्ड, अब्दुल रहीम शेख हुसैन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी वापरलेल्या चारचाकीचा शोध लागला. संबंधित चारचाकी अंबाझरी परिसरातील पार्क स्ट्रीट अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले.
नंदनवन पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तीकडून चौकशी केली. मात्र, चारचाकी मालकाने काही माहिती देण्यास नकार दिला.बिल्डिंगमधील सीसीटीव्ही व घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. तपासात समोर आले की आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो आपल्या मूळगावी तुमसरला पळून गेला होता. नंदनवन पोलिसांनी तात्काळ तुमसर गाठून आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीने कबूल केले की त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला. गुन्ह्याच्या दिवशी त्याने एका फ्लॅटमधून गाडी चोरी केली आणि आपल्या मित्रासह वाठोडा येथील स्क्रॅपच्या गोडाऊनमध्ये गेला. तिथे गार्ड बाहेर झोपलेला होता. चोरी करताना गार्ड उठू नये म्हणून त्याच्या डोक्यात काठीने जोरात मारले. त्यानंतर गार्डचा मोबाइल आणि इतर वस्तू घेऊन दोघंही पळून गेले. गुन्हा केल्यानंतर आरोपी पुन्हा परत आला आणि गाडी ज्या ठिकाणाहून चोरी केली होती तिथेच परत ठेवली. त्यानंतर दोघंही नागपूरहून फरार झाले.