१५०० रुपयांसाठी १४ हजार पुरुष बनले ‘लाडकी बहीण’

१५०० रुपयांसाठी १४ हजार पुरुष बनले ‘लाडकी बहीण’
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही काळाने पात्रता नियम बदलण्यात आले. यानंतर लाभार्थ्यांची छाननी सुरू केली गेली.  छाननीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचे लाभ ऑगस्ट २०२४ पासून देण्यास सुरुवात झाली. महिलांसाठी असणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल १४ हजार २९८ पुरुषांचा समावेश आहे. आता हे पुरुष लाभार्थी कसे बनते. त्यांची छाननी कोणी केली आणि यामागे कोण आहे असे अने प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्य सरकार लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला ४२ हजार कोटी रुपये खर्च करतंय. शिवसेनेत फुटीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरु करण्यात आली. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आहे. दरम्यान, त्यातच या योजनेत पुरुषांची नावं असल्यानं खळबळ उडालीय.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत जवळपास अडीच लाख लाभार्थ्यांच्या नावांबाबत शंकाही उपस्थित केली जात आहे. महिलांची नावे देऊन पुरुषांनी लाभ घेतल्याची शक्यता असून त्याची छाननी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. १४ हजार २९८ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं लक्षात येताच त्यांचे मानधन बंद करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीय. मात्र तरीही ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या २ लाख ८७ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना आतापर्यंत ४३१ कोटी ७० लाख रुपये देण्यात आलेत.

लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.  मात्र तरीही एकाच कुटुंबातल्या दोन पेक्षा अधिक महिलांना याचा लाभ दिला जात आहे. अशा ७ लाख ९७ हजार ७५१ महिला आहेत. त्यांनाही आतापर्यंत ११९६ कोटी ६२ लाख रुपये दिले गेले आहेत. आता अशा अपात्र लाभार्थ्यांना दिलेली रक्कम परत घेणार का? अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून कची वगळणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

संबंधित बातम्या