गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाची उघडझाप कोल्हापूरात सुरू असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने २५ जुलैला रात्री आणि २६ जुलैला पहाटे असे एकूण ४ स्वयंचलित दरवाजे उघडले होते. मात्र २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. ३ आणि ४ बंद झाले आहेत. त्यामुळे स्वयंचलित द्वार क्र. ५ आणि ६ असे एकूण २ द्वारे उघडलेली आहेत. या स्वयंचलित द्वार क्र. ५ व ६ मधून २८५६ क्युसेक व बॉट पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक असा एकूण ४३५६ क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोल्हापुरात घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर असून, पुढचे दोन दिवस कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यातच पावसाची संततधार राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने आणखी काही धरणांतून पाणी सोडले आहे. या वाढत्या पाणीपातळीमुळे जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत असून पंचगंगेची पाणीपातळी २७ फुटांच्यावर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.