मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई, 3 जिल्ह्यांतून केलं तडीपार
- जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर ,वामन मसुरराव तौर अशी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीही समोर आली आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास सहा आरोपींवर परभणी, जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न,अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत.अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखीही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची देखील माहिती मिळत आहे.