त्र्यंबकेश्वर येथील पर्यटनस्थळांवर वीकेंडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अचानक पर्यटकांची गर्दी वाढून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये व त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वन विभागाकडून विशेष काळजी घेतली जात होती.
नाशिक पश्चिमचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार व त्र्यंबकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर व वन विभागाचे पथक पर्यटनस्थळांवर लक्ष ठेवून होते. हरिहर गड, पेगलवाडी व दुगारवाडी धबधबा येथे नागरिकांनी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पावसाळा म्हटला, की निसर्गसौंदर्य बघण्यासाठी नागरिक बाहेर पडतात. त्या माध्यमातून मग पावसाळी सहलीचे बेत आखले जातात. पावसाने जिल्ह्यातील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहे. जणू हिरवा शालू पांघरल्याचा भास इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांसह जिल्ह्याच्या विविध भागात येत आहे. या पर्यटनस्थळांवर पावसाळी पर्यटनाकरीता 'वीकेंड प्लॅन'निमित्ताने नागरिक सहकुटुंब व मित्रपरिवारासह गर्दी करीत आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येते. त्याचप्रमाणे ब्रह्मगिरी, मेटघर किल्ला, पुढे काही अंतर गेल्यास दुगारवाडी धबधबा या भागात पर्यटकांची मोठी गर्दी होती.
दुगारवाडी येथे पर्यटकांना धबधब्याजवळ जाण्यासाठी वन विभागाकडून सक्त मनाई करण्यात आली होती. त्यादृष्टीने निर्बंधही घातले गेले. हरिहर गड येथे टप्याटप्प्याने नागरिकांना किल्ल्यावर सोडले जात होते. त्यामुळे गर्दीचा अतिरिक्त ताण निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी पर्यटनाचा आनंद जरूर घ्यावा; मात्र प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घालू नये. कारण जीवितहानी अथवा अपघात होऊ नये, यासाठीच्या या सूचना आहे, हे समजून घ्यावे. नैसर्गिक सौंदर्य सुरक्षित अंतर ठेवूनच बघावे, असे आवाहन त्र्यंबकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर व त्यांचे पथक पर्यटनस्थळी नागरिकांना करीत होते.