अकोला : २० हजार कर्ज ; अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
अकोला : राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मान्सूनपूर्वच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह वीज कोसळून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे निवडणुकांपूर्वी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर आहे. त्यातच, अकोल्यात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने केवळ 20 हजार रुपयांच्या कर्जापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवानंद सुखदेव इंगळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून शेतातीलच आंब्याच्या झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं जीवन संपवलं. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निमकर्दा येथे देवानंद इंगळे राहात होते. मृत इंगळे यांच्याकडे जवळपास मुद्दल आणि व्याजाची रक्कम मिळून 20 हजार रुपयापेक्षा अधिक कर्ज होते. केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र
अतिवृष्टी व कर्जमुक्ती होत नसल्याच्या चिंतेमुळेच या शेतकऱ्यानं आत्महत्या केली असल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.