तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न; तरुणीची पोलिसांनी केली सुटका, एकाला अटक

तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न; तरुणीची पोलिसांनी केली सुटका, एकाला अटक
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अवघ्या काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावला. अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून, एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
   मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रेल्वे स्थानक परिसरात ही तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास होती आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला तरुण आणि संबंधित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती. तो तरुण तरुणीला भेटण्यासाठी आला असता त्यांच्यात बाचाबाची झाली. याच वादातून तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तरुणीला तिथून घेऊन गेला. हा संपूर्ण प्रकार एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच नांदेड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली. शहरभर नाकाबंदी करत पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि काही वेळातच तरुणीची सुटका करण्यात आली. यातील एका आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून, त्यालाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. या घटनेमुळे नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या