अमरावती : दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन चिमुकलीवर 19 जानेवारी रोजी अत्याचार करण्यात आला. या पीडित चिमुकलीला जिल्हा सामान्य रुग्णालय ( इर्विन ) येथे रेफर करण्यात आले होते. मात्र, यावेळी पिडीत मुलीवर उपचार करण्यात विलंब करण्यात आला. तसेच कर्तव्यावर असलेल्या परिचरिकांनी पीडितेच्या कुटुंबीयांसोबत अरेरावी करीत गैरवर्तन केले. असा आरोप भीम ब्रिगेड संघटनेने केला होता. त्यामुळे या परिचरिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना 20 जानेवारी रोजी केली होती. परंतु कारवाई न झाल्याने 12 फेब्रुवारी रोजी भीम ब्रिगेड संघटनेने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात आत्मदहन आंदोलन करण्यात आले. यावेळी राजेश वानखडे यांच्यासह चार ते पाच कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर डिझेल घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितीत पोलिसांनी तातडीने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.