हवामान खात्याच्या अंदाजानुसार भिवंडी शहर ग्रामीण सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असताना भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असणारी अकलोली वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंड ही तानसा नदीच्या पाणीपात्रात बुडाली आहेत.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने तानसा धरणाचे ३८ स्वयंचलित दरवाजांपैकी १९ स्वयंचलित दरवाजे उघडल्याने तानसा धरणातून २१ हजार २४६ क्युसेस पाण्याचा विसर्ग तानसा नदी पात्रात सोडला गेल्याने भिवंडी तालुक्यातील अकलोली वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर आहे. येथील गरम पाण्याची कुंड पाण्यात बुडाली आहेत तर कुंडावर कोणी जाऊ नये म्हणून गणेशपुरी पोलिसांच्या वतीने सुरक्षितता बाळगण्यात आली आहे. तर नदी किनारील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा ही इशारा देण्यात आला आहे.