भिवंडी : पाशा पटेल यांच्या उपस्थितीमध्ये बांबू लागवडीचा शुभारंभ
बांबू या शाश्वत उत्पादन देणाऱ्या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भिवंडी तालुक्यात बांबू लागवड मोठी प्रमाणावर करावी यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास तयार आहे. त्यासाठी कृषी मूल्य आयोग समिती तथा बांबू मिशन अध्यक्ष पाशा पटेल हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून रविवारी सायंकाळी भिवंडी तालुक्यातील दाभाड व कवाड येथील आंब्याचा पाडा येथे पाशा पटेल यांच्या शुभहस्ते बांबू लागवड करण्यात आली. या प्रसंगी तहसीलदार अभिजित खोले, बाळाराम भोईर, दत्तात्रय कोलेकर यांसह शासकीय अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे व पालघर जिल्ह्यात एक कोटी बांबू लागवडीचे उद्दिष्ट असून त्यासाठी पाशा पटेल हे ठाणे जिल्हा दौऱ्यावर असून भिवंडी व शहापूर येथे शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्त्व समजावून देणार आहेत. यावेळी बांबू लागवडीचे महत्त्व विशद करत असताना पाशा पटेल यांनी बांबू पासून बनवण्यात येणाऱ्या वस्तू यांची माहिती शेतकऱ्यांना देत त्या वस्तु शेतकऱ्यांना दाखवित त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला.