“मतदार यादीतील घोटाळा म्हणजे लोकशाहीची हत्या; निवडणूक आयोग BJPची शाखा बनला”- संजय राऊत

 “मतदार यादीतील घोटाळा म्हणजे लोकशाहीची हत्या; निवडणूक आयोग BJPची शाखा बनला”- संजय राऊत
  • MG News
  • ऑक्टोबर 24 2025

Share on  

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदार यादीतील घोळ, फोन टॅपिंग आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली. “लोकशाहीची हत्या सुरू आहे आणि निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची शाखा बनला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

 

 मतदार यादीतील घोटाळा गंभीर – राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनचा संदर्भ:

राऊत म्हणाले, “दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी मतदार यादी संदर्भात जे प्रेझेंटेशन केलं, तेच प्रेझेंटेशन महाराष्ट्रात आदित्य ठाकरे यांची टीम करणार आहे. हे प्रेझेंटेशन महाराष्ट्र आणि देशाच्या निवडणूक आयोगाने पाहावे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटने हे मोठ्या स्क्रीनवर बघावे, आम्ही त्याची व्यवस्था करू.”

ते पुढे म्हणाले, “लोकशाहीची कशी हत्या झाली हे त्यांना त्यातून समजेल. एका एका विभागात बिनबापाचे मतदार दिसतात. याची खात्री त्यांनाही पटेल की आम्ही लोकशाहीची हत्या केली आहे.”

राऊत यांनी स्पष्ट केले की, “मतदार यादीतील घोळ हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या विषयावर सर्वपक्षीय लोक काम करत आहेत. राज ठाकरे यांनीही आपल्या मेळाव्यात हा मुद्दा अधोरेखित केला. राहुल गांधींनी याची सुरुवात केली असून बिहारमध्ये तेजस्वी यादवांनी ‘वोट अधिकार यात्रा’ काढली. हा संपूर्ण देशाचा गंभीर प्रश्न आहे.”

 एक नोव्हेंबरचा सर्वपक्षीय मोर्चा:

“एक नंबरचा मोर्चा सर्वपक्षीय असेल. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये या मोर्चाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये सर्व नेते एकत्र येऊन माध्यमांशी चर्चा करतील,” अशी माहिती राऊत यांनी दिली.
ते म्हणाले, “निवडणूक आयोगाला आता दणका देणे गरजेचे आहे. आयोगाने लोकशाहीची प्रतिष्ठा वाचवावी.”

 ‘८० रुपयांत मत डिलीट’; BJPचा कट – राऊतांचा गंभीर आरोप:

राऊत यांनी दावा केला, “८० रुपयांमध्ये एक मत डिलीट केले जाते. महाराष्ट्रातसुद्धा हा फॉर्म्युला लागू केला जातोय. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या लोकांनी सहा एजन्सींना या कामात लावले आहे. त्यामुळेच ते म्हणतात की, महापौर आमचा होईल आणि त्यांचे ब्रँड अँबेसिडर कोठारे आहेत.”

 फोन टॅपिंग आणि वॉर रूम प्रकरणावर गंभीर आरोप:

राऊत यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही थेट आरोप केले.
ते म्हणाले, “बावनकुळे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी. त्यांच्या आणि रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने मुंबईतील काही बिल्डर आणि नागपूरमधील यंत्रणांनी मिळून एक ‘वॉर रूम’ उघडली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे, पत्रकारांचे फोन ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप तपासले जात आहे.”

राऊत म्हणाले, “२०१९ मध्ये आमचं सरकार येण्यापूर्वी हे प्रकार उघड झाले होते. त्यावेळी गुन्हे दाखल झाले आणि त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पोलीस महासंचालक होते. आता मुंबई, पुणे आणि नागपूर येथे फोन टॅप करण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे.”

 “गृहमंत्र्यांनी कारवाई करावी; अमित शाह यांचेही फोन टॅप करत असतील”:

राऊत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधत म्हटले, “देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्र सुरक्षा कायद्यांतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल करावा. या लोकांचा काहीच भरोसा नाही, कदाचित हे अमित शाहांचेही फोन टॅप करत असतील! या यंत्रणा आल्या कुठून, याचा शोध घ्यावा लागेल.”

संबंधित बातम्या