आपल्या स्मार्टफोनवर एका क्लिकद्वारे काही मिनिटांत घरपोच सामान मिळवून देणाऱ्या ब्लिंकिट कंपनीच्या कल्याण पूर्वेकडील शेकडो कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. कंपनीने डिलिव्हरीचे अंतर वाढवूनही मोबदला कमी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, मागण्या मान्य होईपर्यंत काम न करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्लिंकिटचे कर्मचारी आधी ३ ते ३.५ किलोमीटरच्या ४५ डिलिव्हरीसाठी विशिष्ट रक्कम घेत होते. मात्र, आता कंपनीने ५ किलोमीटरपर्यंतच्या डिलिव्हरीसाठी मोबदला कमी करून केवळ ४० रुपये देण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, डिलिव्हरीचे अंतर वाढवूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी येणारे पैसे कमी झाले आहेत. कल्याण पूर्वेतील ब्लिंकिट होम सर्व्हिस कंपनीत काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी याचं मुद्द्यावरून काम थांबवले आहे. लोकेशन आणि कामाचे प्रमाण वाढले असतानाही मोबदला न वाढवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे ब्लिंकिटच्या कल्याण पूर्व परिसरातील सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.