मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची वेगवान दुरुस्ती करण्यासाठी मुंबई महापालिकेने 'पॉटहोल क्विकफिक्स' मोबाइल अॅप आणि व्हॉट्सअॅप चॅटबोट सेवा सुरू केली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार करण्याची प्रक्रिया सुलभव्हावी आणि खड्डेदुरुस्ती प्रक्रियेत मुंबईकरांचा सहभाग वाढवावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. अॅप सुरू केल्यानंतर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया केवळ पाचपेक्षा कमी क्लिकमध्ये पूर्ण करता येणार आहे.
हे अॅप अॅन्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींवर उपलब्ध आहे. या अॅपद्वारे नागरिकांना खड्यांचे छायाचित्र, स्थान आणि माहिती अपलोड करून तक्रार नोंदविण्याची सोपी व जलद सुविधा प्राप्त झाली आहे. या अॅपद्वारे करण्यात आलेली तक्रार संबंधित विभागाकडे थेट पोहोचते आणि खड्डेड्दुरुस्ती प्रक्रिया तातडीने सुरू करता येणार आहे. या तक्रारींवर महापालिकेचे अभियंते तत्काळ कार्यवाही सुरू करणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
तक्रारीचे ४८ तासांत निवारण झाले नाही, तर त्याबाबतचा संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी या विषयाची दखल घेऊ शकतील. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर तक्रारदाराला त्याबाबतचा संदेश पाठवला जाईल आणि झालेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदार समाधानी नसेल, तर त्याला तकार पुन्हा खुली करता येणार आहेत.