आडगाव ट्रक टर्मिनल परिसरात उभ्या असणाऱ्या ट्रक मधून डिझेल चोरी करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांच्या स्वाधीन केल्याबद्दल न्यू हरियाणा बेंगळुरू रोडवेजचे मालक व धाडसी ट्रान्सपोर्टर आसिफ खान पठाण यांचा नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. आडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते आसिफ खान यांचा सन्मान करण्यात आला.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष पी.एम.सैनी यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या समस्या निवारण समितीचे अध्यक्ष महेंद्रसिंह राजपूत यांचा देखील सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे जगदीश प्रसाद इंदौरिया, रामभाऊ सूर्यवंशी, दलबीरसिंह प्रधान, बजरंग शर्मा, सुभाष जांगडा, दलजीतसिंह मेहता, तेजपालसिंह सोढा, सियाराम शर्मा, शक्तिसिंह राजपुरोहित, दीपक ढिकले, सोनू शर्मा, रमेश सारस्वत, सुनील जांगडा यांसह पदाधिकारी व वाहतूकदार उपस्थित होते.
या प्रसंगी पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच डिझेल चोरी करणाऱ्या टोळीस पोलिसांच्या स्वाधीन केल्याबद्दल न्यू हरियाणा बेंगळुरू रोडवेजचे मालक व धाडसी ट्रान्सपोर्टर आसिफ खान पठाण व संघटनेचे आभार मानले. तसेच असे प्रकार होऊ नये यासाठी ट्रक टर्मिनल परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल तसेच वाहतूकदारांना पोलिसांच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या वतीने संघटनेच्या विविध समस्यांबाबत पोलिसांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.