घरफोडीतील आरोपी जेरबंद; ६० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
शिरपूर- शिरपूर शहरातील मांडळ शिवारातील कृष्णा व्हिला येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला शिरपूर पोलिसांनी अटक करत सुमारे ६०,४५६ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नरेंद्र सिताराम निकम (वय ६०, रा. कृष्णा व्हिला, प्लॉट नं. १७ ब, मांडळ शिवार, शिरपूर) यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती की, ५ मार्च रोजी रात्री १० ते ६ मार्च रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान, ते कुटुंबासह विवाहसमारंभासाठी बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप व कडी तोडून ७९,६७३ रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
त्यानंतर पो.उ.नि. हेमंत खैरनार हे पथकासह हनुमान जयंती निमित्त पेट्रोलिंग करत असताना शनि मंदिर परिसरात एक इसम संशयास्पद स्थितीत दिसून आला. पोलिस वाहन पाहताच तो पळून जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याने आपले नाव मुकेश भुवनसिंग वास्कले (वय २२, रा. वाक्या, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) असे सांगितले.
पोलिस चौकशीत त्याने शिरपूर येथील घरफोडीची कबुली दिली. पुढील तपासात त्याने चोरीचा मुद्देमाल दहिवद शिवारात लपवून ठेवल्याचे सांगितले. दोन पंचांसमक्ष पोलिसांनी त्याच्याकडून ५ ग्रॅम मणी मंगळसूत्र (३६,०००/-), २ ग्रॅमचे कानातले (१४,४००/-), १ ग्रॅम पेंडल (७,७००/-), व अडीच भार वजनाची चांदीची जोडवी (२,३५६/-) असा एकूण ६०,४५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पो.उ.नि. हेमंत खैरनार यांच्यासह डीबी पथकाचे पोहेका राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, पोकों योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, भटू साळुंके, प्रशांत पवार, सचिन वाघ, मनोज महाजन, आरोफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार तसेच चा.पो.हे.कॉ. ५३२ नासीरखान पठाण, होमगार्ड मिथुन पवार व राम भिल यांनी सहभाग घेतला.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.