विवाहित महिलेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या बसचालकास मंगळवारी (दि.१६) मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. पोलीस त्यास बुधवारी न्यायालयात हजर करणार आहेत. प्रेमप्रकरणातून बसचालकाने शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने ३० वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मृत महिला ही सीएची पत्नी आहे. उमेश गोपीनाथ भवर (वय २९, रा. सुळेवाडी, मखमलाबाद, मूळ रा. आंबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार व मृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित भवर याने फिर्यादीच्या पत्नीस तीन महिन्यांपासून मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्याने पत्नीस पहाटे कॉल्स करण्यासह तब्बल ३० मेसेज केले. तसेच, तिला भेटण्याचा आग्रह केला. मात्र, विवाहित महिलेने त्यास भेटण्यास नकार दिला. तरीही, तो तिला भेटण्यास आला. त्याने पत्नीस धमकी दिली. ही बाब पतीला समजली. त्यांनी संशयित भवर यास समजून सांगितले. तरीही, तो तिला भेटण्यास आला. त्यातून विवाहित महिला ताणतणावात आली. त्रास असह्य झाल्याने तिने २५ ऑगस्ट २०२५ रोजी चांडक सर्कल परिसरातील फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर रोजी संशयित उमेश भवर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.