छत्रपती संभाजीनगर : लेफ्टनंट आकाश गायकवाड यांचे पालकमंत्र्यांकडून अभिनंदन
छत्रपती संभाजीनगर येथील आकाश गायकवाड यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेत त्याने देशपातळीवर 46 वा क्रमांक (रैंक) मिळविला आहे. यासाठी आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्याला शाल व पुष्पगुच्छ देत त्याचे अभिनंदन केले.आकाशचे वडील हे माजी सैनिक आहेत. संरक्षण मंत्रालयांतर्गत विविध लष्करी प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेशासाठी सीडीएस परीक्षा घेतली जाते. गतवर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत एकूण 574 उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये आकाशचे नाव ऑर्डर ऑफ मेरीटमध्ये 46 व्या स्थानावर आहे. आकाशची निवड चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी झाली आहे. आकाशचे वडील माजी सैनिक आहेत. त्यामुळे शालेय जीवनापासून आकाशला लष्करात जाण्याची इच्छा होती. त्यानुसार त्याने मागील काही वर्ष तयारी केली. आकाशचे प्राथमिक शिक्षण सेंट जॉन इंग्लिश स्कूलमध्ये झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण देवगिरी महाविद्यालयात झाले. बीबीए नंतर त्याने एलएलबीचे शिक्षण सुरू केले. त्याचवेळी त्याने सीडीएसची देखील तयारी सुरू केली. दोन वर्षांपूर्वी केवळ दोन गुणांनी त्याची संधी हुकली होती. मात्र, अखेर आता त्याने या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. सैन्यात लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाली आहे. आकाशला एक भाऊ असून तो कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करतो. आई गृहिणी आहे. दरम्यान सैन्यात अधिकारी व्हायचे हे मनात पहिल्यापासून होते. त्यानुसार तयारी सुरू केली. पदवीनंतर सीडीएस परीक्षा होते. मागील चार वर्षांपासून त्याची तयारी करत होतो. अखेर हे स्वप्न साकार झाले. असे आकाश गायकवाड यांनी सांगितले.