येवला रेल्वे स्थानकातील मालधक्क्यावरील पक्क्या सर्क्युलेटिंग एरियाचे बांधकाम सुरू....

येवला रेल्वे स्थानकातील मालधक्क्यावरील पक्क्या सर्क्युलेटिंग एरियाचे बांधकाम सुरू....
  • MG News
  • ऑक्टोबर 29 2025

Share on  

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला रेल्वे स्थानक मालधक्क्यावर  मंजूर झालेल्या पक्क्या सर्क्युलेटिंग एरियाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षभर कांद्यासह इतर शेतमाल मालगाडीत चढवणे आणि खते, सिमेंट आदी माल उतरविणे सुकर होणार आहे.

सध्याचा आपल्या येवला रेल्वे स्टेशन मालधक्क्यावरील सर्क्युलेटिंग एरिया साध्या पद्धतीचा असल्याने पावसाळ्यात तसेच अवकाळी पावसाच्या काळात चिखल, खड्डे, गाडीचे चाक ढासने असे अडथळे निर्माण होऊन माल रेल्वे मालगाडीत चढविणे व उतरविणे गैरसोयीचे ठरत होते. किंबहुना अनेकदा हे काम ठप्प होत होते.परिणामी अशा काळात व्यापारी शेतमाल पाठविण्यास, तसेच आलेला खते, सिमेंट इ. माल उतरविण्यास असमर्थ ठरत होते. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकरी बांधवांना बसत होता.

प्रामुख्याने शेतकरी व व्यापारी बांधवांची ही अडचण लक्षात घेऊन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने या मालधक्क्याचे आधुनिकीकरण व सुधारणेसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला. मंत्री छगन भुजबळ यांनी दि. २ जानेवारी रोजी रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, तर ११ सप्टेंबर रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून याबद्दल मागणी  केली. त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत सर्क्युलेटिंग एरियाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. 

रेल्वे मालवाहतूक सुरक्षित आणि वेगवान करणे यासाठी सर्क्युलेटिंग एरियाचे विशेष महत्त्व असते. कोणताही माल घेऊन आलेली किंवा माल घेऊन जाणारी मालगाडी या भागात उभी राहते. एकाच वेळी मालगाडीच्या सर्व ४२/५८ वाघिणी मावतील इतका लांब हा एरिया असतो. त्यामुळे मालगाडीच्या संपूर्ण लांबीइतका म्हणजेच ७५० मी इतकी त्याची लांबी, तर ३० मीटर रुंदी असते. या मालगाडीतील माल उतरवून घेण्यासाठी किंवा माल चढविण्यासाठी एका वाघिणीसमोर तीन ट्रक, म्हणजेच एकावेळी तब्बल १२६ ट्रक उभ्या राहू शकतात. तसेच या सर्व ट्रक माल चढवून किंवा उतरवून झाल्यानंतर वाहनांच्या गर्दीतून ट्रक व्यवस्थित वळवून पुन्हा विनाअडथळा व अल्पावधीत बाहेर पडता येईल, इतका प्रशस्त हा एरिया असतो.

या सर्क्युलेटिंग एरियामुळे येवला रॅक पॉइंट कार्यान्वित करणे शक्य होईल. तसेच येवला परिसरातून उत्तर भारतात पाठविला जाणारा कांदा, मका यांसारखा शेतमाल मालगाडीत चढविणे, तसेच खते, सिमेंट आदी माल उतरवून घेणे अगदी पावसाळ्याच्या काळात देखील सहज शक्य होणार आहे. कोणतीही मालगाडी आल्यानंतर त्यात शेतमाल चढविण्यासाठी ठराविक अवधी असतो, त्या अवधीत ती मालगाडी लोड न झाल्यास रेल्वेकडून विलंब शुल्क (डॅमरेज) आकारण्यात येते. याचा भुर्दंड देखील व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना सहन करावा लागत असे. ते नुकसान देखील टळणार आहे.

या सर्क्युलेटिंग एरियासाठी नगर-मनमाड महामार्गावरील रेल्वे फाटक क्र. ७४ पासून अप्रोच रोड निर्मित केला आहे. तसेच कोटमगाव उड्डाणपुलापासून देखील अप्रोच रोड प्रस्तावित असून त्यासाठी देखील आपला पाठपुरावा सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी दि.१७ मार्च रोजी रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना पत्र लिहून या ठिकाणी कव्हर्ड गुड्स शेडची देखील मागणी केली आहे. ते झाल्यास मालाची चढउतर आणखी सुरक्षित होणार आहे.

संबंधित बातम्या