उल्हासनगरात धोकादायक इमारत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली, घरांचे नुकसान

 उल्हासनगरात धोकादायक इमारत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली, घरांचे नुकसान
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

उल्हासनगर कॅम्प ३ मधील सी ब्लॉक परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजता एक धक्कादायक घटना घडली. ‘शिव जगदंबा अपार्टमेंट’ या पाच मजली जुनाट इमारतीचा मागचा भाग अचानक कोसळला. इमारतीचा भाग छतापासून थेट ग्राउंड फ्लोअरपर्यंत जमीनदोस्त झाला आणि त्याचा मलबा शेजारील घरांवर कोसळला. या इमारतीमध्ये एकूण २९ फ्लॅट्स आणि दोन दुकाने होती. महापालिकेने ही इमारत याआधीच धोकादायक घोषित करून सील केली होती. मात्र, ती अद्याप पाडण्यात आलेली नव्हती. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेजारील घरांचे छप्पर, भिंती आणि इतर साहित्यांचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर वेळेवर ही इमारत पाडली असती, तर आज आमचं नुकसान टळलं असतं असं नागरिकांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर शहरातील अन्य धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने आता तरी जागं व्हावं, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या