शिरपूर तालुक्यात युरिया खताचा मुबलक साठा असूनही शेतकऱ्यांना त्रास

शिरपूर तालुक्यात युरिया खताचा मुबलक साठा असूनही शेतकऱ्यांना त्रास
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

शिरपूर तालुक्यात युरिया खताचा पुरेसा साठा असूनही शेतकऱ्यांना वेळेवर खत न मिळाल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीपाद कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याची जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी युरियाच्या रिकाम्या गोण्या घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ वरिष्ठांशी संपर्क साधून शिरपूरसाठी युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला.

मात्र, उपलब्ध साठा असूनही श्रीपाद कृषी सेवा केंद्राने खत वितरणात दिरंगाई केल्याने शेतकऱ्यांना दिवसभर गोडाऊनवर उभं राहावं लागलं. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला.

पाटील यांनी तत्काळ गोडाऊनवर भेट देत संबंधित दुकानदारास बोलवून शेतकऱ्यांना त्वरित खत वितरित करण्याची मागणी केली. मात्र, दुकानदार उशिरा आल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं. शेतकऱ्यांनी सदर कृषी सेवा केंद्राच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत संबंधित दुकान मालकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागणीची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. 

संबंधित बातम्या