मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. आरक्षण, शेतकरी प्रश्न, ओबीसी–मराठा वाद, तसेच राजकीय नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे ही पत्रकार परिषद लक्षवेधी ठरली.
मराठा आरक्षणावर ठाम भूमिका:
“मी मरेपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडणार नाही. आरक्षण होऊन आलं आहे, पण जर अडथळे आणले गेले तर आम्ही गप्प बसणार नाही,” असे पाटील म्हणाले. शासनाने १९९४ चा जीआर रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. “पावणे दोनशे जाती आरक्षण घेत आहेत. जर आम्हाला सारखं असल्याचे सांगून काही जाती आरक्षण घेत असतील तर त्यांनाही बाहेर काढा,” अशी मागणी त्यांनी केली.
सरकारला इशारा:
५८ लाख नोंदींची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावी, अशी मागणी त्यांनी केली. “गॅझेट प्रमाणे अर्ज स्वीकारा, प्रमाणपत्र द्या. नाहीतर दिवाळीनंतर आंदोलन जड होईल,” असा इशाराही सरकारला दिला. शिंदे समितीला नोंदी शोधायला तात्काळ लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ओबीसी – मराठा प्रश्नावर भूमिका:
“ओबीसी आणि मराठ्यांमध्ये काहीही वाद नाही. ही मोठी चूक आधी झाली. मात्र, पुढे सरसकट ओबीसीवर टीका होणार नाही. केवळ त्यांच्या नेत्यांवर आणि लाभार्थ्यांवरच प्रश्न उपस्थित केले जातील,” असे स्पष्ट करून पाटलांनी तणाव निवळवण्याचा प्रयत्न केला.
“मराठा आरक्षणानंतर मी धनगर, मुस्लिम आणि सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणार आहे. शेतकऱ्यांना हक्काचे मिळाले पाहिजे. हे आंदोलन ऐतिहासिक होणार आहे. जे शंभर वर्षांत मिळालं नाही ते शेतकऱ्यांना मिळेल,” असे त्यांनी जाहीर केले. राजकीय सभा टाळून फक्त शेतकरी हितासाठी बैठकीनंतर आंदोलन सुरू करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
“बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या. माझ्या नादी लागू नका. तुमचं राजकारण संपवीन. तुम्ही किती हुशार आहात हे माहिती आहे. पण जर माझ्या आड आलेत तर बाजार उठवीन,” अशा शब्दांत त्यांनी थेट इशारा दिला. मुंडे यांच्या प्रचाराला जो कोणी येईल त्यालाही लक्ष्य करणार असल्याचे ते म्हणाले.
“प्रमाणपत्र वाटप करा, दोन वर्षांत उत्तर दिलं नाही. तुम्हाला मानतो कारण तुम्ही वयस्कर आहात, पण उत्तर देणं गरजेचं आहे,” असे तायवाडेंविषयी त्यांनी स्पष्ट केले. “मी विकला जाणार नाही, कुणाकडून मॅनेज होणार नाही. टाईट आंदोलन सुरू करणार,” असे ठाम शब्दांत ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न, तसेच समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न यावर लढा देण्याचा निर्धार स्पष्ट केला. त्याचबरोबर काही राजकीय नेत्यांवर थेट टीका करून त्यांनी राज्याच्या आगामी राजकीय वातावरणाला अधिक ताप आणला आहे.