वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पूल उभारावेत; देवयानी फरांदे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पूल उभारावेत; देवयानी फरांदे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
  • MG News
  • ऑक्टोबर 11 2025

Share on  

शहरातील वाहतुकीच्या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन अतिशय महत्त्वपूर्ण प्रस्ताव सुचवले आहेत. यात प्रामुख्याने सुयोजित गार्डन ते वृंदावन लॉन्स असा २४ मीटर रुंदीचा रस्ता तयार करणे, विद्या विकास सर्कलजवळील जुने पंपिंग स्टेशन ते मखमलाबाद असा नदीवरून पूल तयार करणे तसेच सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगरची वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी या भागातून उड्डाणपूल करणे आदी प्रस्तावांचा यात समावेश आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत असून, पर्यायाने शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आजमितीस नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख दरम्यान आहे. सिंहस्थ पर्वणीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येतील. त्यावेळी नाशिक शहरात सुमारे ४५ ते ५० लाख इतकी मोठी लोकसंख्या असेल. आजमितीस शहरात असलेले रस्ते अतिशय तुटपुंजे वाटत आहेत. पाच किलोमीटरचा प्रवास करावयाचा झाल्यास किमान अर्धा तासाचा कालावधी लागतो. यात अशोक स्तंभ ते गंगापूर गावापर्यंत जाणारा रस्ता, पंचवटीकडे जाणारे रस्ते तसेच सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर भागात जाणारा रस्ता यांवरून मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामला नागरिकांना सामोरे जावे लागते. सिंहस्थ कुंभमेळ्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सध्याच्या रस्त्यांना समांतर (पर्यायी) रस्ते निर्माण करावे लागतील तसेच काही ठिकाणी छोटे उड्डाणपूल देखील उभारावे लागतील. ही सर्व रस्त्यांची कामे सिंहस्थपूर्वी होण्यासाठी संबंधितांना आदेशित करावे, अशी आग्रही मागणी देखील प्रा. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आ. फरांदेंनी सुचविलेले तीन प्रमुख प्रस्ताव –

१) फॉरेस्ट नर्सरी ते वृंदावन लॉन्स रस्ता :
यात मुख्यत्वे गंगापूर रोडची आनंदवल्ली ते गंगापूर नाका वाहतूक कमी करण्यासाठी विकास आराखड्यातील फॉरेस्ट नर्सरी पुलालगतचे सुयोजित गार्डन ते आसाराम बापू पूल, चांदशी पूल, आनंदवल्ली पूल, नवश्या गणपती ते वृंदावन लॉन्स गंगापूर रोडला समांतर असा २४ मीटर रुंदीचा नवा रस्ता तयार करणे गरजेचे आहे. या प्रस्तावित रस्त्यादरम्यानची बहुतांशी जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. ती काही प्रमाणात संपादित करून हा रस्ता झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

२) विद्या विकास सर्कल ते मखमलाबाद रोड पूल :
गंगापूर रोडवरून पंचवटीत जायचे असल्यास अशोक स्तंभ किंवा रविवार कारंजावर जावे लागते. त्यामुळे या भागांतही वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. ही समस्या सोडवण्यासाठी विद्या विकास सर्कल ते मखमलाबाद रोड असा गोदावरी नदीवरून पूल झाल्यास गंगापूर रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

३) सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर उड्डाणपूल :
एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल मार्गे इंदिरानगर बोगदा रस्ता हा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे. सातपूर एमआयडीसी कंपन्यांची सुटी झाल्यानंतर नाशिकरोड भागाकडे राहणारे कामगार सर्व या रस्त्याचा वापर करतात. तसेच अंबड एमआयडीसी, गंगापूर रोड, कॉलेज रोड येथून नाशिकरोडला जाणारी संपूर्ण वाहतूक या रस्त्याने होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या रस्त्यावर रोजच सायंकाळी वाहतूक कोंडी असते. त्यातच एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल परिसरामध्ये बहुमजली इमारती नव्याने उभ्या राहत आहेत. या इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्यास आल्यानंतर या मार्गावर वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावणार आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सर्वात प्रथम इंदिरानगर बोगद्याजवळ वाहनांना बाहेर पडण्यास जागा करणे, सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर रस्त्यावर उड्डाणपूल करणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या