काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘संविधान सत्याग्रह यात्रा’ ही जनतेच्या संवेदनशील भावनांचा आवाज असल्याचे सांगितले. “ही यात्रा संविधानाच्या मूल्यांवर आणि विचारांवर आधारित आहे. संघाचे १०० वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी आपले कार्यक्रम घेतले, पण आम्ही काय करावे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे सपकाळ म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “भगतसिंग यांचा विचार हा संविधानाचा विचार होता, संघाच्या विरोधाचा विचार होता, हे भगतसिंग यांच्या भाच्यानेच स्पष्ट केले आहे. आमची संविधान सत्याग्रह यात्रा यशस्वी झाली असून आमचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे. संघाच्या पुढील वर्धापन दिनापर्यंत आम्ही पदयात्रा काढून ‘संघ विसर्जित करा आणि संविधान स्वीकारा’ अशी मागणी करणार आहोत. तसेच संघाने आपले संस्थेचे नोंदणीकरण करावे अशी आमची भूमिका आहे.”
सपकाळ यांनी संघावर टीका करताना म्हटलं की, “महात्मा गांधी यांची जगभरात ओळख हिंदू म्हणून आहे, पण संघाला आजही जगभरात हिंदुत्वाच्या नावाने ओळख मिळालेली नाही. उलट हिंदूंना बदनाम करणारी संघटना अशी त्यांची ओळख होत आहे. १०० वर्षे पूर्ण झाल्यावर संघाने सावरकर यांच्या पुतळ्यासमोर मानवंदना दिली असती तर चाललं असतं, पण त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर दिली हे त्यांच्या वैचारिक गोंधळाचं द्योतक आहे.”
“आमची भूमिका वैचारिक आहे आणि आमचा विरोधही वैचारिक आहे,” असे स्पष्ट करत सपकाळ म्हणाले, “नाण्यावर काय छापलं यावरही समाजात चिंतन होण्याची गरज आहे. आम्ही काढत असलेल्या पदयात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे. राहुल गांधी आम्हाला सतत मार्गदर्शन करत आहेत.”
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. “अमित शहा यांनी मुंबईत बंद दरवाज्यात चर्चा करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर उघडपणे चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री दिल्लीला गेले, पण शेतकऱ्यांऐवजी सुरजगडवर चर्चा करून आले ही दुर्दैवी बाब आहे,” असे ते म्हणाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारले असता सपकाळ म्हणाले, “दोघे भाऊ आहेत, एकत्र भेटणारच. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही पुन्हा भेटू.”
एव्हीएमवरील संशय व्यक्त करत त्यांनी सांगितले, “कामठी असो वा इतर ठिकाणं वोट चोरी झाली आहे. ‘व्होट चोर’ हा आमचा नारा आहे.”
तुषार गांधी यांच्या विधानावर सपकाळ म्हणाले, “त्यांनी कोणती भूमिका मांडली हे मला माहिती नाही. त्यांच्या सोबत चर्चा करूनच मत मांडेन.”
ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले, “जातीनिहाय जनगणना व्हावी ही आमची स्पष्ट भूमिका आहे. हा मोर्चा ओबीसी संघटनांचा आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देतो.”