कुशावर्त कुंड शुद्धीकरणासाठी ४०हजारांचा वीजखर्च;तरीही पाणी अशुध्दच

कुशावर्त कुंड शुद्धीकरणासाठी ४०हजारांचा वीजखर्च;तरीही पाणी अशुध्दच
  • MG News
  • जुलै 2 2025

Share on  

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्तातील पाणी बदलण्यासाठी नगर परिषदेला दरमहा तब्बल ४० हजार रुपयांचे वीजबिल भरावे लागत आहे. इतका खर्च करूनही भाविकांना शुद्ध पाणी मिळत नसल्याची तक्रार साधू-संतांकडून वारंवार व्यक्त केली जाते.

कुंडातील पाण्याचा हिरवा रंग आणि पाण्याची दूषितता लक्षात घेता नगर परिषदेने जलशुद्धीकरणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीचे उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वतावर असून, त्याच्या पायथ्याशी असलेले तिर्थराज कुशावर्त हे भाविकांचे प्रमुख स्नानस्थळ आहे. दर सोमवारी आणि विशेषतः श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

तथापि, पाणी शुद्ध केले जात नसल्याचा आरोप स्थानिक साधू-महंतांनी वेळोवेळी केला आहे. नियमितपणे पाणी बदलले जात नसल्यामुळे कुशावर्ततील पाणी हिरवे पडते आणि दूषित होण्याचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने सखोल निरीक्षण व वैज्ञानिक तपासणी केली. तब्बल तीन महिने संशोधन करून कुशावर्तात टाकले जाणारे पाणी, त्यातील घटक, आणि रंग बदलण्याची कारणे यांचा अभ्यास केला
संत निवृत्तीनाथ चौकातील गंगासागर तलावातून कुशावर्तात पाणी आणले जाते. या पाण्यातील काही नैसर्गिक घटकांमुळे पाण्याला हिरवा रंग येतो. तथापि, हे पाणी दूषित नसल्याचे नगरपरिषदेच्या परीक्षणातून स्पष्ट झाले असून, ते स्नानासाठी योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाणी शुद्धीकरण प्रक्रिया

फिल्टरेशन व सेडिमेंटेशन या प्रक्रियांद्वारे जलशुद्धीकरण केले जाते. स्थानिक पाणीपुरवठा विभाग आणि नगरपरिषदेच्या मदतीने कुंडातील पाण्याची गुणवत्ता नियमित तपासली जाते.

धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व

कुंभमेळ्याच्या कालावधीत कुशावर्त कुंडाची शुद्धता राखणे अत्यावश्यक असते. देशभरातून येणाऱ्या साधू-संत आणि भाविकांसाठी कुंडाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे येथील पाणी नेहमीच स्वच्छ आणि शुद्ध राहणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या