लखमापूर येथील शेतकरी सोमनाथ ठाकरे यांच्या गाईला रविवारी सकाळी सर्पदंश झाल्यानंतर वेळेवर उपचार मिळाले नाहीत. परिणामी, गाईचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामागे सरकारी पशुवैद्यकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाचा आरोप होत आहे.
सर्पदंश झाल्यानंतर ठाकरे यांनी लखमापूर येथील पशुधन पर्यवेक्षक यांना संपर्क केला. मात्र, संबंधित अधिकारी ढकंबे येथे दुसऱ्या गाईच्या उपचारासाठी असल्याचे सांगून अनुपस्थित होते. सरकारी डॉक्टर उपलब्ध न झाल्याने ठाकरे यांनी खासगी डॉक्टरांकडून मदत घेतली. परंतु सर्पविषविरोधी लस सरकारी दवाखान्यात उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. खासगी औषधी विक्रेत्याकडे तीच लस तब्बल ३५ हजार रुपये किमतीची असल्याचे सांगण्यात आले.
आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ठाकरे हे ही महागडी लस घेऊ शकले नाहीत. परिणामी, उपचाराअभावी गाईचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही पंचनामा करण्यासाठी कोणताही अधिकृत पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. या घटनेबाबत ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, पंचनामा करण्याचा मेसट यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, पंचनामा करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे सांगण्यात आले. तर संबंधित डॉक्टरांनी, मी त्या वेळी ढकंबे येथे उपचारासाठी होतो.
फोनवरून ठाकरे व खासगी डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक माहिती दिली होती. मात्र, सरकारी लस उपलब्ध नव्हती. म्हणून खासगी ठिकाणाहून लस घेण्यास सांगितले होते, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, वेळेवर सरकारी उपचार व सुविधा मिळाल्या असत्या, तर माझ्या गाईचा जीव वाचला असता, असा संतप्त आरोप ठाकरे यांनी केला असून सरकारी यंत्रणांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.