बीडमध्ये चर्चेत असणाऱ्या आवादा कंपनी विरोधात आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. आवादा पवन ऊर्जा कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. बीडच्या केज तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे.
केज शिवारातील सर्वे नंबर ७६ येथे आवादा कंपनीचे अधिकारी हे पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार वीजेचे खांब शेतात बसवीत नसून, त्यांचे अधिकारी गावगुंडांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत. या बाबत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला निवेदनाद्वारे कळविले आहे. मात्र आवादा कंपनीचे लोक पुन्हा सर्वे नंबर ७६ मधील शेतकऱ्यांना दमदाटी करून त्रास देत आहेत. तसेच पूर्वी झालेल्या सर्वे प्रमाणे काम करत नाहीत. त्यामुळे शेतात राहत असलेल्या महिला व शेतकरी भयभीत झाले आहेत.
हे काम तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालयासमोर रेणूका तेलंग, संगिता तेलंग, साविता भोसले, स्वाती भोसले, कमल वळसे, मीरा थोरात, मेघराज भोसले, सुर्यकांत तेलंग, गोरख थोरात, अशोक भोसले, संतराम भोसले, मारुती भोसले, पांडूरंग भोसले, बलभीम तेलंग हे आमरण उपोषणाला बसले आहेत.