शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई व कर्जमाफी द्यावी ;रोहित पवार यांची मागणी

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई व कर्जमाफी द्यावी ;रोहित पवार यांची मागणी
  • MG News
  • ऑक्टोबर 1 2025

Share on  

गेल्या तीन महिन्यांत 60 लाख हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले असून त्यापैकी जवळपास 50 टक्के नुकसान मराठवाड्यात झाले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातही शेतकरी संकटात सापडले आहेत.

रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. त्यांनी सांगितले की –

शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून मदत द्यावी.

खरडलेल्या जमिनीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करावा.

विद्यार्थ्यांचे शाळा व हॉस्टेल फी माफ करावी.

शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळावी.

त्यांनी स्पष्ट केले की, आताच कर्जमाफी करण्याची योग्य वेळ आहे, पण सरकार अजूनही झोपेत आहे. "मुख्यमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षात असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर कोणतेही पाऊल उचलले नाही," असा आरोप त्यांनी केला.रोहित पवार यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, "गुजरातला न्याय वेगळा आणि महाराष्ट्राला न्याय वेगळा असं करू नये. महाराष्ट्रासाठी तातडीने 8 हजार कोटींची मदत जाहीर करावी."

शेतकरी आत्महत्यांवर चिंता:

"देशातील 40 टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. पिकांना भाव नाही, सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. शेतकरी संकटात असताना राज्यकर्त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे," असे पवार म्हणाले.

एसटी दरवाढीवर टीका:

रोहित पवार यांनी एसटी दरवाढीवरूनही सरकारला धारेवर धरले. "लालपरीच्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. शेतकरी आधीच संकटात आहे, त्यात ही दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी," अशी मागणी त्यांनी केली.

‘ओला दुष्काळ’ या शब्दावरील वाद:

पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, "ओला दुष्काळ हा शब्द अस्तित्वातच नाही, मग विरोधी पक्षनेते असताना हा शब्द वापरून सरकारकडे मागणी का केली जात होती? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे."

गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका:

पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यांचा निषेध केला. ते म्हणाले – पडळकर पातळी सोडून बोलतात, त्यांची वैचारिक बैठकच नाही. फडणवीस स्वतः स्वच्छ राहतात, पण बहुजन नेत्यांना खालच्या पातळीवर जाऊन बोलण्यासाठी वापरतात. "पडळकर मंगळसूत्र चोर आहेत" असं कुणी म्हटलं नव्हतं, पण त्यांनी अंगावर घेतलं. "फडणवीस यांनी हे छोटेमोठे नेते नियंत्रित केले नाहीत, तर महाराष्ट्र माफ करणार नाही."


अनिल देशमुख हल्ला प्रकरण:

रोहित पवार म्हणाले की, "पोलीस प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. अनिल देशमुख यांच्या संदर्भात जो हल्ला झाला, त्याबाबत आलेला रिपोर्ट लोकांसमोर आणावा आणि सत्य मांडावे."

संबंधित बातम्या