चीनच्या सीमेजवळील अमूर प्रदेशात ४९ प्रवासी घेऊन निघालेलं एक रशियन प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं. विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा या भीषण विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. विमानात पाच मुलांसह ४३ प्रवासी आणि सहा क्रू सदस्य होते.
अंगारा एअरलाइन्सचे अँटोनोव्ह-२४ हे विमान होतं. विमानाने उड्डाण केल्यानंतर ते टिंडा इथे पोहोचण्यापूर्वी हवाई वाहतूक नियंत्रकांशी विमानाचा संपर्क तुटला, त्यानंतर तात्काळ शोध मोहिम सुरू करण्यात आली, अशी माहिती स्थानिक आपत्कालीन मंत्रालयाने दिली.
विमान दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू असून रशियाच्या तपास समितीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेमुळे रशियामध्ये शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.