अधिकारी व ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; अपघाती मृत्यू झालेल्या युवकाच्या वडिलांची मागणी

अधिकारी व ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; अपघाती मृत्यू झालेल्या युवकाच्या वडिलांची मागणी
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

 माझ्या मुलाच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकारी व भिवंडी वाडा रस्त्याची दुरुस्ती करणारे ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे या अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत यश मोरे याचे वडील राजेश मोरे यांनी गुरुवारी माध्यमांसमोर शासनाकडे केली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून रस्त्याची पाहणी न करता फाईलवर सह्या करून ठेकेदारांची बिले अदा करत आहेत. ज्यावेळेस ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या घरात असा अपघात होईल त्यानंतरच या अधिकारी व ठेकेदारांचे डोळे उघडणार का? असा संतप्त सवाल देखील यावेळी राजेश मोरे यांनी केला.

  भिवंडी वाडा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात १८ वर्षीय यश राजेश मोरे याचे उपचारादरम्यान बुधवारी रुग्णालयात निधन झाले. या निधनानंतर बुधवारी संतप्त कुटुंबीय व ग्रामस्थांनी भिवंडी वाडा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलीस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ता दुरुस्त करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. व त्यानंतर कुटुंबीयांनी मृत मुलाचे अंत्यसंस्कार केले. या घटनेने परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग व  रस्ता दुरुस्त करणाऱ्या ठेकेदारांविरोधात तीव्र संताप पसरला आहे.
       सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे आज माझा भाऊ आमच्यातून निघून गेला.आम्ही दोघे बहीण भावंडे एकमेकांवर प्रेम करत होतो. ९ तारखेला रक्षाबंधन आहे, आता मी राखी कोणाला बांधणार अशी मन हेलावणारी भावनिक प्रतिक्रिया मयत यशच्या बहिणीने दिली आहे. यशच्या निधनाने मोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित बातम्या