मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या वेळेवर आहेत. मुंबईत भायखळा, लालबाग, सीएसएमटी आणि चर्चगेट भागात जास्त पाऊस झाला. घाटकोपर आणि आसपासच्या भागात सकाळी १० वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आयएमडी ने आज 'यलो' इशारा दिला आहे. पुढील २४ ते ३६ तासांत १५० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.