मराठवाड्यातील अतिवृष्टी, पुरस्थिती आणि शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राऊत म्हणाले की, “मराठवाड्याचा पाहणी दौरा हा फक्त भास आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत गेले कधी? त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकला कधी? चर्चा केली कधी? आज 36 लाख शेतकरी उध्वस्त झाले आहेत. अनेक जिल्ह्यात काहीच शिल्लक राहिलेले नाही.”
त्यांनी पुढे टोला लगावला की, “पाण्याच्या बाटलीवर फोटो लावून मदत होत नाही. मदत ही गुप्त असली पाहिजे. महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी नक्की काय केलं? कोणतं पथक पाठवलं? हे शासन म्हणजे मुर्दाड शासन आहे. पैशाचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका.”
राऊत यांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहारावरूनही सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “यांच्या दरोडी खोरीमुळे आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे. लाडक्या बिल्डरच्या SRA प्रकरणात खिसे तपासले तरी पैसे पडतील. पण शेतकऱ्यांसाठी पैसा नाही. निवडणुकीवर खर्च करण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही. गरीबांना द्यायचं झालं की हे दरोडेखोर बनतात.”
यावेळी त्यांनी भाजपवरही जुना मुद्दा उकरून काढला. “कोरोना काळात आम्ही आमदार-खासदार यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावे, असे सुचवले होते. पण भाजप नेत्यांनी त्यावेळी निधी देण्याऐवजी PM केअर फंडमध्ये पैसे जमा केले.”
याशिवाय, चीन आणि लडाख मुद्द्यावरूनही राऊत आक्रमक झाले. ते म्हणाले, “लडाख-लेह हा भारताच्या सीमेचा भाग आहे. चीन तिथे घुसला आहे आणि तुम्ही भारताची सीमा सुरक्षित ठेवू शकत नाही. तरीही स्वतःला विश्वगुरु म्हणवून घेता? आक्रमकता दाखवायची असेल तर सीमेवर दाखवा. देशाच्या जनतेवर अत्याचार का करता?”
राऊत यांनी शेवटी स्पष्ट केले की, “आज उद्धव ठाकरे लातूरपासून संभाजीनगरपर्यंत दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेता उपस्थित नाहीत कारण ते विधानसभेत प्रश्न विचारतील म्हणून सरकारला भीती आहे. राहुल गांधींचे वक्तव्य योग्य आहे – तुमचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही.”