इगतपुरी : अवकाळी पावसाचा हाहाकार: शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून, अडसरे बुद्रुक गावातील शेतकऱ्यांचे उन्हाळी कांदा पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहे. अडीच हेक्टर क्षेत्रातील कांदा पावसामुळे चिखलात सडल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
कांदा विक्रीतून मिळणाऱ्या पैशांच्या आधारे शेतकरी भातपिकाची लागवड करतात. मात्र अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.