वेंगुर्ले मठ परबवाडी येथील शेतकऱ्यांच्या सुमारे चार ते पाच एकर क्षेत्रात गावठी भाजी वाल, भेंडी, मुळा भाजी, लाल भाजी, भोपळा, दोडके अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले होते. मात्र, सततच्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव भाजीपाल्यावर झाला आणि गवा रेड्याच्या अतिक्रमणामुळे भाजीपाला क्षेत्र नष्ट झाले. रानटी जनावरे व अतिवृष्टी या दुहेरी संकटात सध्या तळकोकणातील शेतकरी सापडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात शेतकरी असल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गेले काही दिवस सातत्याने पडणारा पाऊस व त्याच बरोबर जंगली रानटी गवारेडा यांच्या अतिक्रमणामुळे तळ कोकणातील भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला कुजणे प्रक्रिया होते त्याबरोबरच गवारेडा वन्य प्राण्याच्या आक्रमणामुळे भाजीपाल्याची नासधूस झाल्याने तळ कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. सध्या भात शेती ही परवडणारी नसल्याने शेतकरी भाजीपाला उत्पादन आपल्या शेतात करतो. गणेश चतुर्थी काळात व श्रावण महिन्यात शाकाहार मोठ्या प्रमाणात घेत असल्याने आहारात भाजीचा वापर सर्वाधिक असतो. त्याचबरोबर गणेश चतुर्थी काळात भाजी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे लाखोंची उलाढाल या भाजीपाला उत्पादनातून घेतली जाते. नफ्यामध्ये असणारा भाजीपाला व्यवसाय अतिवृष्टी व रानटी जनावरांच्या अतिक्रमणामुळे तोट्यात चालला आहे.
वनविभागाकडून व कृषी विभागाकडून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. भाजीपाला उत्पादक शेतकरी याला जमिनीत भाजीपाला उत्पादन होण्यासाठी बियाणे, खत, मजूर यांचा खर्च हा न परवडणारा असतो. मात्र, यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले गेले. परंतु रानटी गव्यांचा कळप भाजीपाला उत्पादन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर पूर्णतः नासधूस करतो. त्यामुळे फुलोऱ्यावर आलेले व फळधारणा होण्याच्या प्रक्रियेत असलेला भाजीपाला नष्ट झाला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी काळात गावठी भाजी महागणार आहे.