अपुऱ्या सुविधांमुळे ओझरहून आंतरराष्ट्रीय उड्डाणास ब्रेक

अपुऱ्या सुविधांमुळे ओझरहून आंतरराष्ट्रीय उड्डाणास ब्रेक
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

ओझर विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू व्हाव्यात यासाठी वर्षभरापासून प्रयत्नशील असलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी यासंदर्भात पुन्हा एकदा मंगळवारी (दि. २२) संसदेत थेट प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला विचारणा केली. मात्र केंद्र सरकारकडून अपेक्षित उत्तर मिळू शकले नाही.

लोकसभेत खासदार वाजे यांनी गृह मंत्रालयाला पाच स्पष्ट प्रश्न विचारले. ओझर विमानतळावर इमिग्रेशन तपासणी केंद्र सुरू करण्याबाबत सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला मंजुरी दिली आहे का? इमिग्रेशन ब्युरोने आवश्यक सुविधांची पूर्तता झाल्याचे मान्य केले आहे का? आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रणाली आणि कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव आहे का? ही सुविधा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सुरू होणार आहे का? आणि या संदर्भात आंतर-मंत्रालयीन समन्वयासाठी कोणती पावले उचलली जात आहेत? असे प्रश्न वाजे यांनी उपस्थित केले.

मात्र, गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या उत्तरात, ओझर विमानतळाची सध्या आंतरराष्ट्रीय नियोजित प्रवासी सेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अपुरी असल्याचे नमूद करत केवळ कार्गो व चार्टर्ड फ्लाइटच्या तपासणीसाठीच सध्या ती जागा उपयोगी असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, काही पोलिस अधिकाऱ्यांना इमिग्रेशन प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती देण्यात आली. मात्र नियमित आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. यासंदर्भात वाजे यांनी 'ओझर विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होणे ही नाशिककरांची मागणी नाही, तर हक्काची बाब आहे. केंद्र सरकारने या विषयाकडे केवळ कागदोपत्री न पाहता प्रत्यक्ष कृती करावी,' अशा शब्दांत वाजे यांनी सरकारला सुनावले.

संबंधित बातम्या