इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग लागली. या आगीमध्ये लहान मुलांसह ६० जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अल-कुत शहरातील एका शॉपिंग मॉलला २ बुधवारी रात्री उशिरा आग लागली.अचानक भडका उडाला आणि संपूर्ण शॉपिंग मॉलला आगीने वेढा घातला. ही आग लागली तेव्हा शॉपिंग मॉलमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक होते त्यांना बाहेर पडता आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, इराकच्या अल-कुत शहरातील शॉपिंग मॉलला बुधवारी रात्री उशिरा आग लागली. या घटनेत आतापर्यंत ६० जण जिवंत जळाले. तर अनेक जण अद्यापही मॉलमध्ये अडकले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही आग इतकी भीषण आहे की ती वाढतच चालली आहे. मॉलच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
सोशल मीडियावर या भीषण आगीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. काही क्षणातच ही आग शॉपिंग मॉलच्या एक-एक मजल्यावर पोहचली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे.
महत्वाचे म्हणजे, ही आग लागली तेव्हा शॉपिंग मॉलमध्ये अनेक जण उपस्थित होते. आग लागताच एकच गोंधळ उडाला. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले पण काहींना वेळीच बाहेर पडता आते नाही. या आगीमध्ये ६० जणांचा मृत्यू झाला असुन अनेक जण मॉलमध्ये अडकून पडलेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आतापर्यंत ५९ मृतदेहांची ओळख पटवली आहे. पण एकाचा मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे ओळख पटवणं कठीण झाले आहे. मॉलमध्ये अजून अनेक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यांचे मृतदेह बाहर काढण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या शॉपिंग मॉलला आग लागण्यामागचे कारण शोधले जात आहे. पोलिस तपास करत आहेत.