जळगाव जिल्ह्यातील सुमठाणे भागात एका विकृत सिरीयल किलरने दीड महिन्यात दोन महिलांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमाचे खोटे नाटक करून महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या या नराधमाचे नाव अनिल गोविंदा संदानशिव आहे.
सुदैवाने, त्याच्या तावडीतून एक तिसरी महिला थोडक्यात बचावली आणि तिच्यामुळेच हे भयानक सत्य समोर आले आहे.
अनिल गोविंदा संदानशिव, ज्याचे प्रेमाने गोडबोलणे आणि सोज्वळ आणि समजूतदारपणे वागणे होते, पण त्याच्या प्रेमाच्या मुखवट्यामागे विकृत मन दडलेले होते. महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे, त्यांचा विश्वास जिंकणे आणि नंतर त्यांना निर्जन ठिकाणी नेऊन ठार मारणे, हा त्याचा गुन्हा करण्याचा पॅटर्न होता.
जळगावमध्ये उघडकीस आलेले 'सीरीयल किलिंग' प्रकरण हे मन सुन्न करणारे आहे. अनिल संदानशिव हा महिलांशी गोड बोलून त्यांच्याशी मैत्री करायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. विश्वास बसल्यानंतर तो त्यांना सुमठाणे शिवारातील एका निर्जन जंगलात घेऊन जायचा. तिथे शरीरसंबंध ठेवल्यानंतर तो दगडाने ठेचून ठेवून त्यांची निघृण हत्या करायचा आणि मृतदेह तिथेच फेकून द्यायचा. हत्या करण्यापूर्वी तो त्यांच्याकडील दागिने आणि पैसे लुटत असे.
अनिलने शोभाबाई कोळी आणि वैजयंताबाई भोई या दोन महिलांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. यापैकी वैजयंताबाई भोई यांची ओळख त्याच्याशी सुरत येथे झाली होती. प्रेमाच्या आणाभाका घेऊन तो त्यांना जळगावला घेऊन आला आणि नंतर त्यांची हत्या केली. २३ जुलै रोजी पोलिसांना हाडांचे अवशेष मिळाले. जवळ असलेल्या आधारकार्डमुळे ओळख पटली. २५ जून रोजी शोभाबाई कोळी यांचा मृतदेहही त्याच जंगलात सापडला होता.
तिसरी महिला शाहनाज बी ही या दुर्दैवी घटनांची साक्षीदार ठरली. अनिलने तिलाही त्याच ठिकाणी नेले, पण तिने आरडाओरड केल्याने काही लोक मदतीला धावले आणि आरोपी पळून गेला. त्यामुळे शाहनाज यांचा जीव वाचला.