जालना : अवकाळी पावसामुळे शाळेचे नुकसान; जीवितहानी टळली

जालना : अवकाळी पावसामुळे शाळेचे नुकसान; जीवितहानी टळली
  • MG News
  • मे 22 2025

Share on  

जालना : अवकाळी पावसामुळे शाळेचे नुकसान; जीवितहानी टळली

        मागच्या आठ दिवसांपासून जालना जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे, तर विजा पडून कित्येक शेतकऱ्यांना व नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना सुद्धा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाल्याचे जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहायला मिळाले आहे. 
     ही आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सिंधी पिंपळगाव येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. या शाळेत या गावातील शेतकऱ्यांच्या मजुरांची मुलं आपलं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत शिक्षण घेत आहेत. मात्र, या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने या शाळेची दुरावस्था केली असल्याचे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. काल दिनांक 20 मे व 21 मे 2025 रोजी बदनापूर तालुक्यासह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे या शाळेचे होत्याचे नव्हते झाले. हा वादळी वारा एवढा जोरात होता की, शाळेवर मजबूत भिंतीत व अँगलच्या माध्यमातून केलेले पत्रे उडाली आहे व ही पत्रे 40 ते 50 फूट उंच झाडावर जाऊन अटकली, तर काही गावात गल्लीत जाऊन पडली. सुदैवाने यामध्ये शाळा बंद असल्यामुळे कुठलीही जीवितहानी जरी झाली नाही. मात्र, शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. 
    या वर्ग खोल्यांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत होते. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे सर्व विद्यार्थी आपापल्या घरी होते. त्यामुळे विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. तरी या शाळेची झालेली दुरावस्था पाहून गावातील सर्व लोक एकत्र येत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे की, शाळा अवघ्या एका हप्त्यावर आता सुरू होणार आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच या शाळेची दुरुस्ती करावी व आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी याप्रसंगी या ग्रामस्थांनी केली आहे. 

संबंधित बातम्या