कल्याण : इमारतीचा स्लॅब कोसळला; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वमधील मंगळराघो नगर, चिकणीपाडा परिसरात मंगळवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. 'सप्तशृंगी' नावाच्या चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक तळमजल्यापर्यंत कोसळला.
यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील चिकणीपाडा येथील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही चार मजली इमारत होती. ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे २:५५ वाजता घडली आहे. घटना घडताच मोठी खळबळ उडाली आहे. तसेच घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक (TDRF), पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
चार जखमींना इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेत एक अडीच वर्षांची मुलगी अजूनही ढिगाऱ्याखाली अडकली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंत्रांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
या घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांमध्ये एक दीड वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. उर्वरित दोन पुरुष किंवा महिला याची माहिती अद्याप अधिकृत नाही. सप्तशृंगी इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत होती. स्थानिक प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही कुटुंबे अद्यापही तिथे वास्तव्यास होती. ही निष्काळजीपणाची बाब असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि TDRF पथक घटनास्थळी उपस्थित आहे. अद्याप बचाव कार्य सुरू आहे. प्राथमिक चौकशी सुरू असून, दोषींवर कारवाईचे संकेत महापालिकेकडून देण्यात आले आहेत. "इमारत जुनी होती, आम्ही अनेक वेळा महापालिकेला कळवले. पण कुणीच ऐकले नाही," असं एका स्थानिक रहिवासीने सांगितले आहे. ही दुर्घटना फक्त नैसर्गिक नव्हे तर मानवी दुर्लक्षाचा परिणाम आहे. इमारती धोकादायक असल्याचे माहिती असूनही योग्यवेळी ती रिकामी का केली गेली नाही, हा मुख्य प्रश्न आहे.