कल्याण : दहावी निकालानंतर जल्लोष; विद्यार्थ्यांचा आनंद, शिक्षकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून, निकालाची टक्केवारी तब्बल ९४.१०% इतकी लागली आहे. निकालाची घोषणा होताच कल्याण-डोंबिवली परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यावेळी शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दहावीच्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. यावर्षी महाराष्ट्रात तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील १४ लाखांहून अधिक विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी ९४.१० टक्क्यांवर पोहोचली असून, हा निकाल समाधानकारक असल्याचं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.कल्याण आणि डोंबिवली परिसरात निकाल लागल्यानंतर विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत यशाचा आनंद व्यक्त केला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक पालकांनीही आपल्या मुलांच्या यशावर आनंद व्यक्त करत शिक्षकांचे आभार मानले.