कल्याण : “तुमचा सातबारा नाही कारवाई तर होणारच” फेरीवाल्यांना सहायक आयुक्त मुंबरकर यांचे कडक शब्द
ANC - डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांवर केडीएमसीने पुन्हा एकदा धडक कारवाई केली. ‘फ’ प्रभाग क्षेत्राच्या सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. फेरीवाल्यांनी अर्धा रस्ता अडवून ठाण मांडल्यामुळे प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
डोंबिवली पूर्वेकडील ‘फ’ प्रभाग हद्दीतील स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी केडीएमसीकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. शुक्रवार, 9 मे रोजी सायंकाळी सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी फेरीवाला अतिक्रमण विभागाच्या पथकासह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई केली.
कैलास लस्सीपासून स्टेशन परिसरापर्यंत सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत मुंबरकर यांनी फेरीवाल्यांना थेट सुनावले की, “तुमचा सातबारा नाही कारवाई तर होणारच.”दुकानासमोर फेरीवाल्यांनी भाजीपाला, फळे, खेळणी, व विविध वस्तू मांडल्यामुळे नागरिकांच्या ये-जा मध्ये अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे काही दुकानदारांनीही फेरीवाल्यांना आपल्या दुकानासमोर जागा न देण्याचे आवाहन केले.
महापालिकेच्या या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, फेरीवाला मुक्त स्टेशन परिसरासाठी ही मोहीम नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.