डोंबिवली आरटीओ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार विरोधात सर्व रिक्षा संघटना कृती समितीच्य माध्यमातून एकत्र येत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण यांना दिलेल्या निवेदनात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आणले आहेत. कार्यालयातील कर्मचारी सुधाकर कुमावत यांनी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे डोंबिवली सरचिटणीस दिगंबर गिराम यांच्याकडे मोबाईल लिंक करण्यासाठी थेट ४०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनाही सहकार्य केले जात नसून, त्यांच्याकडूनही पैशांची मागणी केली जात असल्याचे समितीने म्हटले आहे. निवेदनानुसार, रिक्षाचालकांचे कोणतेही काम खाजगी दलालांमार्फत लाच दिल्याशिवाय केले जात नाही.
याशिवाय, रिक्षा स्क्रॅप करताना वजनाप्रमाणे मोबदला न देता, इन्स्पेक्टर आणि भंगारवाला संगनमत करून रिक्षाचालकांची फसवणूक करत आहेत. सीएनजी किटमधील पितळी वॉलची चोरी, कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन आणि अरेरावी, तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची हेराफेरी असे अनेक गंभीर आरोपही या रिक्षा युनियनच्या समितीने केले आहेत. आरटीओ कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरू असून, रिक्षाचालकांची व नागरिकांची लूट सुरू आहे. कर्मचाऱ्यांची मनमानी व दादागिरी सुरू असून, कायदे व नियम धाब्यावर बसवून कार्यपद्धती सुरू आहे," असे समितीने निवेदनात नमूद केले आहे. या सर्व अंदाधुंद कारभाराबाबत मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि परिवहन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज निवेदन देताना, कृती समितीच्या सदस्यांनी आरटीओ अधिकारी बारकुल यांच्याशी चर्चा करताना मोठा गोंधळही घातला. यावर, आरटीओ अधिकारी बारकुल यांनी संबंधित प्रकरणात चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या सर्व भ्रष्ट आणि मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर पुढील पंधरा दिवसांत उग्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षाचालकांनी दिला आहे. या गंभीर आरोपांमुळे कल्याण आरटीओ कार्यालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, प्रशासकीय पातळीवर यावर काय कारवाई होते, याकडे सर्व रिक्षाचालकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.