शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात वनताराकडे रवाना करण्यात आलं. यावेळी भावनिक होत ग्रामस्थांनी मिरवणूक काढत महादेवीला निरोप दिला.
दरम्यान मिरवणुकीच्या शेवटी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीमुळं पोलिसांनी लाठीचार्ज केला. हत्तीला गावातून नेण्याला विरोध असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणत प्राण्याचा रुग्णवाहिकेतून हत्तीणीला रवाना केले . या सगळ्या मिरवणुकीदरम्यान नांदणीकराना अश्रू अनावर झाले होते.
नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे ही हत्तीण होती. महादेवी असं या हत्तीणीच नाव आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय देताना, प्राण्यांचा गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं. त्यानंतर नांदणी येथील हत्तीणीला गुजरातच्या वनतारा याठिकाणी रवाना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याची माहिती समजताच ग्रामस्थांनी या हत्तीणीला नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर २८ जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात तिला गुजरातला नेण्यात आलं आहे.
गेली अनेक वर्ष ही हत्तीण नांदणीच्या मठात होती. गावातील लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हिचा लळा होता. या हत्तीणीला निरोप देताना सगळ्यांना अश्रू अनावर झाले होते. जिनसेन भट्टाचारक महाराज यांच्या डोळ्यातही अश्रूधारा होत्या. तळहातांच्या फोडाप्रमाणे या हत्तीणीचा सांभाळ केला होता. म्हणूनच गावाकऱ्यांनी या महादेवी हत्तीणीला नेण्याला विरोध केला.
रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून चालवले जाणारे वनतारा वाईल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहाबिलेशन सेंटर हे प्राणी काळजी केंद्र मानले जाते. ३५,००एकर भूभागात पसरलेले हे केंद्र ३३,०० प्रजातींतील सुमारे १०,००० प्राण्यांचे निवारा घर आहे. विविध प्राणी या संग्रहलयात आहेत. या प्राण्यांसाठी आरोग्यविषयक आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याच वनकेंद्रात आता नांदणीतील महादेवी हत्तीण देखील असणार आहे.