नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनेक सराईत गुन्हेगारांचे फोटो आणि अंमली पदार्थांचे सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक सेंट्रल जेल चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत कारागृह अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती दिली. यापूर्वी देखील अनेकदा सेंट्रल जेलच्या कैद्यांकडून शेकडो मोबाईल जप्त करण्यात आले असून, याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे. चारही बाजूने कडेकोट बंदोबस्त असताना देखील मोबाईल आणि अंमली पदार्थ जेलमध्ये गेलेच कसे असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. तर गुन्हेगारांसाठी जेल देखील घरच झाले असल्याचे चित्र फोटो आणि व्हिडीओवरून दिसून येत आहे.
नाशिकच्या कारागृहात महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील अनेक कुख्यात गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्यानंतर ठेवण्यात येते. यामध्ये मुंबई आणि पुण्यामधील अनेक सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या बंद आहे. या टोळ्यांची मोठी दहशत असून, यांच्यावर राजकीय आणि मोठ्या गुंडांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी कारागृह प्रशासनाशी आर्थिक हितसंबंध जोपासले जातात. त्यामध्ये या गुन्हेगारांना चांगले जेवण देणे, आरोग्य समस्येच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयात दाखल करणे, मोबाईल, अंमली पदार्थ, चैनीच्या वस्तू पुरवणे अशा सुविधा दिल्या जातात. त्यामुळे अनेकदा गुन्हेगार जेलमधून आपल्या टोळ्या चालवत आपली दहशत माजवत असल्याचे उघड झाले आहे.
नुकत्याच नाशिकच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री नाशिकमध्ये असताना कारागृहात कैद असलेल्या मोक्का मधील अनेक सराईतांचे फोटो आणि अंमली पदार्थ सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत जेलमध्ये मोबाईल आणि अंमली पदार्थ गेलेच कसे याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. तसेच, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कडक कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे आता जेलच्या सुरक्षेमध्ये चूक करणाऱ्या आणि गुन्हेगारांना अंमली पदार्थासह व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.