नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे योग्य पद्धतीने भरले जात नसल्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी वीसे चौक परिसरातील खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली.
पाहणीदरम्यान आमदार फरांदे यांच्या लक्षात आले की सदर काम अंदाजपत्रकाप्रमाणे आणि तांत्रिक निकषांनुसार सुरू नाही. याबाबत उपस्थित उपअभियंता श्री. बोरसे यांना त्यांनी समोर घेतले असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, नाशिक महानगरपालिकेच्या कॉलिटी कंट्रोल विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नितीन पाटील यांना तत्काळ बोलावण्यात आले.
आमदार फरांदे यांनी सील कोट सारखा महत्त्वाचा घटक अंदाजपत्रकात समाविष्ट न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच “रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये,” असे सांगून त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना याबाबत लेखी पत्र देण्याचे स्पष्ट केले.
तसेच या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता श्री. नितीन पाटील यांना दिले.
या पाहणीवेळी माजी नगरसेविका स्वाती भामरे, भाजपा नाशिक मध्य विधानसभा प्रमुख अनिल भालेराव, राजू भामरे, इंजी. अजिंक्य फरांदे, प्रवीण मराठे, अक्षय गांगुर्डे, गोपी राजपूत यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.