KALYAN | अनधिकृत बांधकामाविरोधात सासू-सुनेचं केडीएमसी मुख्यालयाबाहेर ४ दिवसांपासून आमरण उपोषण
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. दोन वर्षांपासून कारवाईच्या मागणीसाठी पाठपुरावा करणाऱ्या सासू आणि सून उपोषणाला बसल्यानंतरही पालिकेने कारवाई न करता उलट बंगल्याला अधिकृततेचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील आयरे गावात सासू अलका आणि सून रीमा म्हात्रे यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात अखेर उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. मौजे आयरे, सर्वे नं. १४/४ या जमिनीवर सारिका म्हात्रे यांनी अनधिकृतपणे बंगला बांधल्याचा आरोप शरद म्हात्रे यांच्या पत्नी अलका म्हात्रे यांनी केला आहे. २०२३ पासून सातत्याने महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे अखेर त्यांनी आणि त्याच्या सुनेने आमरण उपोषण सुरू केलं आहे. विशेष म्हणजे, याआधी पालिकेने तीन वेळा लेखी पत्र देऊन सदर बांधकाम अनधिकृत असून, लवकरच कारवाई करण्यात येईल असं सांगितलं होतं. पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला होता. या प्रकारामुळे केवळ नियोजनशून्यता नव्हे, तर अनधिकृत बांधकामांना पालिकेचे वरदहस्त असल्याचा आरोपही केला जात आहे. पालिकेच्या या वागणुकीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, "सामान्यांसाठी नियम आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळच्यांसाठी सूट" असा दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे.