खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद

खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद
  • MG News
  • सप्टेंबर 26 2025

Share on  

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सध्याच्या मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची बिकट अवस्था आणि केंद्र-राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाडा दौरा करून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. “शेतकऱ्यांकडे अजूनही मदत पोहोचलेली नाही. पंचनाम्यासाठी अधिकारी पोहोचले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केवळ फोटो लावण्यात गुंतलेले आहेत. शेतकरी मात्र कर्जमाफीची मागणी करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी दोन महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत :

1. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या.
2. सरसकट कर्जमाफी जाहीर करा.

राऊत यांनी आरोप केला की मुख्यमंत्री एकीकडे टोलवाटोलवी करत आहेत, तर उपमुख्यमंत्री म्हणतात “पैशाचं सोंग आणता येणार नाही.” त्यांनी तिखट भाषेत टीका करताना सांगितले की, “पीएम केअर फंडात इतकी प्रचंड रक्कम आहे की लोकांना वाटतं ते भारताच्या बजेटपेक्षा जास्त आहे. त्याचा वापर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करा.”

शेतकऱ्यांचा संताप व्यक्त करताना राऊत म्हणाले की, “गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात,” अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. मंत्री तानाजी सावंत फक्त एक दिवस मतदारसंघात येतात, उरलेला वेळ पुण्यात घालवतात, अशी टीका त्यांनी केली.

राऊत यांनी सांगितले की, ११ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात मोठा शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाचे नेतृत्व स्वतः उद्धव ठाकरे करणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल.

त्याचबरोबर फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. “फडणवीस पेशव्यांच्या काळातील शहाणे असल्यासारखे बोलतात. ‘ओला दुष्काळ’ हा शब्द शासकीय नाही असं ते म्हणतात, पण लोक मात्र ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत आहेत. अजित पवारांची भाषा ही त्यांची स्टाइल नाही, तर मगरुरी आहे. हे तिघे गोट्या खेळण्याच्या लायकीचे आहेत, भ्रष्ट आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

राऊत पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका, पण त्यांच्या सडक्या डोक्यात फक्त राजकारणाचाच विचार येतो. थाण्याचे उपमुख्यमंत्री फोटो लावून मदत देत आहेत. मुख्यमंत्री यांना निवेदन द्यावं लागतं, ही फारच हास्यास्पद गोष्ट आहे.”

सहकार खातं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अखत्यारित आहे, त्यांच्याकडून सहज २-५ हजार कोटींची मदत मिळू शकते. “अमित शाह यांनी त्यांच्या मुलाला सांगावं, क्रिकेट बोर्डाकडून २-५ हजार कोटी रुपये द्या आणि मदत करा,” असे उपरोधिक वक्तव्य राऊतांनी केले.

ते पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांना घेऊन दिल्लीला जावं, पंतप्रधान, अर्थमंत्री, कृषिमंत्री आणि सहकार मंत्री यांची भेट घेऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी.”

भारत-पाक सामना प्रकरण

पत्रकार परिषदेत राऊतांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरूनही भाजपवर निशाणा साधला. “मोदी, शाह आणि जय शाह रविवारी बसून सामना पाहतील, पण दुसरीकडे लडाखमध्ये लोक मारले जात आहेत. भाजपमध्ये एकतरी मायका लाल आहे का, जो पाकिस्तानसोबत सामना खेळू नका असं सांगेल?” असा सवाल त्यांनी केला.

संभाजी भिडे प्रकरण

संभाजी भिडे यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, “कोणाच्या नादाला लागता? हे सगळं तुमच्याच डोक्यावर चढवलं आहे. भिडे हे संघाचे, भाजपचे लोक आहेत. भारत-पाक क्रिकेट सामन्याला समर्थन करणारे लोक आहेत. हे सगळे पात्र भाजपने निर्माण केले आहेत.”

अजित पवारांवर टोला

राऊत म्हणाले की, “अजित पवार सकाळी सहा वाजता बांधावर जातात, पण त्यांनी आपल्या राज्यात काय चाललं आहे याचीही माहिती ठेवली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी काल मुद्दा मांडला होता, तेच आज अजित पवार मागणी म्हणून मांडत आहेत.”

संबंधित बातम्या