एमयूके एक्स्पो २०२५ उदघाटन सोहळा उत्साहात

एमयूके एक्स्पो २०२५ उदघाटन सोहळा उत्साहात
  • MG News
  • ऑक्टोबर 12 2025

Share on  

नाशिक : मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्था, नाशिक जिल्हा यांच्या वतीने “ MUK EXPO 2025 ” या भव्य उद्योजक प्रदर्शनाचे आयोजन नाशिक शहरातील उदाजी महाराज संग्रहालय परिसरात मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मराठा समाजातील उद्योजकांना एकत्र आणून त्यांचे व्यवसाय, उत्पादने आणि नवकल्पना सादर करण्याची ही उत्कृष्ट संधी ठरली. या एक्सपोचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे, माननीय खासदार राजाभाऊ वाजे आणि माननीय आमदार सौ. देवयानी फरांदे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी मराठा सेवा संघ, मविप्र संस्था, मराठा उद्योजक कक्ष आणि विविध उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा उद्योजक कक्षाच्या कार्याचे विशेष कौतुक करत सांगितले की, “नाशिक जिल्ह्यातील मराठा उद्योजक कक्षाचे कार्य हे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी रोल मॉडेल ठरू शकते. अशा प्रकारचे उपक्रम राज्यभर आणि देशभर सुरू व्हावेत, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.” त्यांनी मराठा समाजातील नव्या पिढीला व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठा उद्योजक कक्ष आणि मविप्र संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गेल्या तीन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात उद्योजकतेच्या क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. त्यांनी नमूद केले की, “दरवर्षी सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल मराठा उद्योजक कक्षाच्या माध्यमातून होत आहे. ही केवळ आकड्यांची वाढ नाही, तर मराठा समाजाच्या आत्मनिर्भरतेची साक्ष आहे.” तसेच मविप्र संस्था नेहमीच मराठा उद्योजकांच्या पाठीशी उभी राहील असे अश्वासन देत त्यांनी राजर्षी शाहू महाराज शिक्षण परिषद, नाशिक येथे आयोजित  करण्यासाठी संस्थात्मक सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

आपल्या भाषणात आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी मराठा उद्योजक कक्षाचे काम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी शासनाकडून नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना आणि संधींची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला जात आहे. तसेच शासनातर्फे  500 मराठा मुला-मुलींसाठी निवासी वसतिगृह उभारले जात असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे.” मराठा समाज शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे, हे समाजाच्या एकतेचे आणि प्रगतीशीलतेचे द्योतक असल्याचे त्या म्हणाल्या.

माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांनी एक्सपोतील सर्व स्टॉलला भेट देऊन विविध उद्योजकांशी संवाद साधला. त्यांनी मराठा समाजातील उद्योजकतेची वाढ पाहून आनंद व्यक्त केला व म्हणाले, “सरकार दरबारी उद्योजकांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी मी नेहमी पुढाकार घेईन. अशा प्रकारचे उद्योजक मेळावे पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणात आयोजित केले जावेत.”

या एक्सपोमध्ये विविध क्षेत्रातील मराठा उद्योजकांनी आपली उत्पादने, सेवा आणि नवकल्पना सादर केल्या. खाद्यप्रक्रिया, कृषीउद्योग, उत्पादन, शिक्षण, तंत्रज्ञान आणि महिला उद्योजकता या सर्व क्षेत्रांचा समावेश या प्रदर्शनात होता. पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन उद्योजकांचे अभिनंदन केले, संवाद साधला आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष खरेदीही केली. 

“MUK EXPO 2025” हे केवळ एक व्यवसाय प्रदर्शन नव्हे, तर मराठा समाजातील उद्योजकतेच्या सामूहिक शक्तीचे प्रतिक ठरले.
या उपक्रमातून नाशिक जिल्ह्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, शिक्षण, संघटन आणि उद्योजकता हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे खरे बळ आहे.

संबंधित बातम्या