मुक्ताईनगर : पत्रकार आणि तत्पर पोलिसांनी चोरट्यांना गजाआड 

मुक्ताईनगर : पत्रकार आणि तत्पर पोलिसांनी चोरट्यांना गजाआड 
  • MG News
  • मे 16 2025

Share on  

ज्ञानेश्वर सावळे एमजी न्यूज मुक्ताईनगर

मुक्ताईनगर : पत्रकार आणि तत्पर पोलिसांनी चोरट्यांना गजाआड 

मुक्ताईनगर  पत्रकाराच्या जागरूकतेमुळे आणि मुक्ताईनगर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे बसस्थानकात महिलांच्या पर्स चोरणाऱ्या महिला टोळीला अटक करण्यात यश आले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सुकळी (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी सरलाबाई जिजाबराव पाटील आणि त्यांचे पती जिजाबराव पाटील हे 15 मे रोजी सकाळी 10 वाजता रिक्षाने मुक्ताईनगर येथे पोस्ट ऑफिसमध्ये पासबुक घेण्यासाठी आणि किराणा खरेदीसाठी आले होते. कामे आटोपून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतण्यासाठी मुक्ताईनगर बसस्थानकावर आले. कुऱ्हा जाणाऱ्या बस चढताना प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत ५-६ अनोळखी महिलांनी धक्काबुक्की करत सरलाबाई यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली छोटी पर्स चोरली.

चोरी झाल्याचे लक्षात येताच सरलाबाई घाबरल्या आणि रडू लागल्या. त्या अस्वस्थ अवस्थेत काय करावे हे समजत नव्हते.

पत्रकाराची जागरूकता
याचवेळी तिथे उपस्थित असलेले पत्रकार प्रमोद सौंदळे यांनी सरलाबाई यांच्याकडून संपूर्ण प्रकार जाणून घेतला. त्यांनी तातडीने जागरूकता दाखवत मोबाइलवरून पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांची तत्पर कारवाई
पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद पवार आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा पाटील यांना बसस्थानकावर पाठवले. पोलिसांनी सरलाबाई यांच्यासह इतर प्रवाशांकडे चौकशी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे यांनी हेडकॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे यांना बोदवड चौफुलीकडे संशयित महिलांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. सुरवाडे यांनी तिथे काही संशयित महिलांना पाहिल्याची माहिती मोबाइलवरून दिली. लागलीच संपूर्ण पोलीस पथक बोदवड चौफुलीवर पोहोचले. तिथे चौकशीदरम्यान संशयित महिलांकडून सरलाबाई यांची चोरीला गेलेली पर्स जप्त करण्यात आली.

पोलिसांनी सर्व संशयित महिलांना ताब्यात घेऊन अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे मुक्ताईनगर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

सरलाबाई आणि जिजाबराव पाटील यांनी पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, हेडकॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे, कॉन्स्टेबल गोविंद पवार आणि महिला कॉन्स्टेबल सुवर्णा पाटील यांचे मनापासून आभार मानले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी
मुक्ताईनगर बसस्थानकावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रवाशांनी बसस्थानकावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. अशा उपाययोजनांमुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

.पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
मुक्ताईनगर पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पत्रकार आणि पोलिसांच्या समन्वयाने चोरट्यांना जेरबंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे.

 

संबंधित बातम्या